नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरहून गुजरातच्या द्वारका येथे जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात घडला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी दिली आहे. अपघात झालेल्या बसमध्ये ४८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळली, असेही त्यांनी सांगितले.
बसमधील ४८ भाविकांना घेऊन बस नाशिकतील त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती, यादरम्यान हा अपघात झाला. बसमधील भाविक हे मध्य प्रदेशमधील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील आहेत.
या दुर्घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य सेवांनी तातडीने मदतीची व्यवस्था केली आहे. जखमी प्रवाश्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताच्या कारणांची तपासणी सुरू केली असून, या घटनेची अधिक माहिती अद्याप सांगण्यात आलेली नाही.
या दुःखद घटनेमुळे प्रवाशांच्या कुटुंबियांवर गंभीर संकट कोसळले आहे. स्थानिक प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.