भारतात लग्न म्हटलं की संगीत आणि नाच यांचा समावेश होतोच. प्रत्येक लग्नात हे कमी-अधिक प्रमाणात केलं जातं. पण दिल्लीतील एका लग्नात नवरदेवाने एका प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर केलेला डान्स त्याला चांगलाच भोवल्याचे पाहायला मिळालं. नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी लग्नात ‘चोली के पिछे क्या है’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स केलं. पण नवरीच्या वडिलांना हे आवडलं नाही आणि त्यांनी चक्क लग्नच मोडून टाकल्याचं पाहायला मिळालं.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाची वरात नवी दिल्लीतील लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचली. यावेळी नवरदेवाच्या मित्रांनी त्याला वरातीत वाजत असलेल्या बॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह केला. नवरदेवही मित्रांबरोबर नाचू लागला. पण हे कृती नवरीच्या वडिलांना आवडलं नाही. नवभारत टाइम्सने या घटनेसंबंधीचे वृत्त दिलं आहे.
नवरदेवाचे वागणे हे अयोग्य असल्याची टीका करत मुलीच्या वडिलांनी लग्नाच्या पुढील विधी करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर नवरदेवाच्या कृतीमुळे त्यांच्या कौटुंबिक मूल्यांचा अपमान झाल्याचे सांगत त्यांनी लग्नही मोडून टाकलं.
हा सगळा प्रकार पाहून वधूला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. यावेळी नवरदेवाने मुलीच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न अपयशी ठरले. मीडिया रिपोर्टनुसार, लग्न मोडल्यानंतरही वडिलांचा राग संपला नाही. त्यांनी त्यांची मुलगी आणि नवरदेवाच्या कुटुंबात कोणतेही संबंध ठेवण्यासही मनाई केली आहे.
सोशल मीडियावर होतेय चर्चा
या घटनेबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ही घटना व्हायरल झाली असून एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर अनेकांनी याबद्दल पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी मुलीच्या वडिलांनी योग्य निर्णय घेतला, अन्यथा हा डान्स दररोज पाहावा लागला असता असं म्हटलं आहे. तर दुसर्या एका युजरने “माझ्या लग्नात जर तुम्ही ‘चोली के पिछे’ वाजवलं तर मी देखील नाचेन” अशी कमेंट केली आहे.
ही घटना समाजातील संस्कृती आणि आधुनिकतेच्या संघर्षाचं प्रतीक बनली आहे. लग्नातील आनंद आणि उत्साहाच्या नावाखाली केलेल्या कृतींची मर्यादा किती असावी, यावर ही घटना चर्चा करण्यास भाग पाडते.