पुणे : ‘मोफत साडी, धान्य वाटप, शेठला मुलगा झाला आहे’, अशी बतावणी करून शहरात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करून त्यांच्याकडील पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पर्वती, भारती विद्यापीठ आणि हडपसर भागात अशा फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.
भारती विद्यापीठ परिसरातील चंद्रभागा सोसायटी रस्त्यावर ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करून त्यांच्याकडील ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत ६२ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरात राहतात. त्या रविवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले आणि ‘आमच्या भागातील नगरसेवकाला मुलगा झाला आहे. ते ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करत आहेत’, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला तिचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले आणि बोलण्यात गुंतवून ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करत आहेत.
पर्वतीतील शाहू वसाहत परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली. याबाबत ७० वर्षीय ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला शाहू वसाहतीत राहतात. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्या शाहू वसाहत परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले आणि ‘आमच्या शेठला मुलगा झाला आहे. ज्येष्ठ महिलांना भेटवस्तू दिल्या जात आहेत’, असे आमिष दाखवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला तिचे दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले आणि बोलण्यात गुंतवून एक लाख २६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहेत.
हडपसरमधील मांजरी भागात पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाकडील साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक मांजरीतील बेल्हेकर वस्ती परिसरातून निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले आणि ‘या भागात चोऱ्या होतात. दागिने काढून ठेवा’, असे सांगून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची साखळी आणि अंगठी काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले आणि ‘पोलीस ठाण्यात चला’, असे सांगून बोलण्यात गुंतविले. त्यावेळी चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करत आहेत.