गुरूवार, फेब्रुवारी 13, 2025
Homeक्रीडामहाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे?

महाराष्ट्र केसरी – शिवराज राक्षे?

महाराष्ट्र केसरी २०२५ च्या उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा गोंधळ घडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात केवळ ४० सेकंदातच निकाल लागला आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरवले. यानंतर शिवराज राक्षे यांनी पंचांशी वाद घातला आणि व्हिडिओ रिव्ह्यू पाहून निर्णय देण्याची मागणी केली. परंतु पंचांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केला. या प्रकरणात शिवराज राक्षे यांनी पंचांचा कॉलर धरला आणि त्यांना लाथ मारल्याचेही आरोप आहे. या घटनेनंतर कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे यांना ३ वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाचे प्रतिध्वनी आता राजकीय वर्तुळातही ऐकू येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी या सामन्यातील निकालाला “फिक्स” असल्याचा आरोप केला आहे. आव्हाड म्हणाले, “काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना झाला आणि आश्चर्यकारक निकाल लागला. या उपांत्य फेरीच्या लढतीचा व्हिडिओ मी खाली टाकला आहे. हा व्हिडिओ कुणीही बघू शकतो. शिवराज राक्षेची पाठ जमिनीला लागलीच नाही; त्याची कूस जमिनीवर लागली. शिवराजची कूस जमिनीला लागल्यावर पृथ्वीराज मोहोळ कुस्ती जिंकला, असे जाहीर करण्यात आले. कूस लागल्यावर प्रतिस्पर्धी जिंकत नसतो, हे सांगण्यासाठी कोणा कुस्तीतज्ज्ञाची गरज नाही. कारण, मातीला पाठ लागली तरच चितपट घोषित केले जाते. ही तर मॅटवरची कुस्ती आहे, त्यामुळे सगळेच स्पष्ट दिसतेय. सध्याच्या टीव्ही कॅमेरांमुळे तर अधिकच स्पष्टता येते. म्हणूनच ही कुस्ती फिक्स होती… मॅच फिक्सिंग होती, हे उभ्या महाराष्ट्राला कळले आहे.”

त्यांनी या प्रकरणात राजकारणाचा हस्तक्षेप असल्याचाही आरोप केला आहे. आव्हाड म्हणाले, “कुस्तीत हे कुठलं राजकारण शिरलंय. जे खरोखरच ताकदीचे आणि मेहनतीने पुढे आलेले पैलवान आहेत; त्यांना राजकारण करून मागे ढकलण्याचे काम सिकंदर शेखपासून सुरू झाले आहे. आज मला एका गोष्टीचा प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो, जो प्रकार रागावून, अन्याय झाल्याने शिवराज राक्षेने पंचांसोबत केला. तोच जर सिकंदर शेखने केला असता तर आतापर्यंत सिकंदर शेखच्या अख्ख्या खानदानाची, त्याच्या आई-बहिणीची लाज रस्त्यावर निघाली असती. टोलधाडीने त्याला छळ… छळ छळला असता. पण, त्याने शांतपणे अन्याय सहन केला आणि परत अन्यायावर मात करून महाराष्ट्र केसरी किताब जिंकला.”

त्यांच्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी असेही म्हटले आहे, “असो, पण या कुस्तीमध्ये खरा जिंकला तो शिवराज राक्षेच! ठरवून पृथ्वीराज मोहोळ याला जिंकविण्यात आले. अंतिम फेरीतही महेंद्र गायकवाड यानेही पंचांच्या पक्षपाती धोरणाचा निषेध करीत मैदान सोडले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुधात विरजण कोण घालतंय? एवढं ‘मोहोळ’ का उठले? कारण… राजकारण!”

या प्रकरणामुळे कुस्ती स्पर्धेतील पारदर्शकता आणि न्याय्य निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवराज राक्षे यांच्या निलंबनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा राजकीय आणि सामाजिक पातळीवर परिणाम होणार असल्याचे दिसते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments