गुरूवार, फेब्रुवारी 13, 2025
Homeदेश-विदेश“वीकेंडला काम करणं म्हणजे…”- एलॉन मस्क

“वीकेंडला काम करणं म्हणजे…”- एलॉन मस्क

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी “वीकेंडलाही काम करणे ही एक सुपरपॉवर आहे” असा दावा केला आहे. मस्क यांच्या या विधानानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वर्क-लाइफ बॅलन्सच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी एल अँड टी च्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असे म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता मस्क यांच्या विधानाने या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

एलॉन मस्क यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “खूप कमी नोकरदार लोक प्रत्यक्षात वीकेंडला काम करतात, त्यामुळे असे वाटते की विरोधी संघ फक्त दोन दिवसांसाठी मैदान सोडतो! वीकेंडला काम करणे म्हणजे एक सुपरपॉवर आहे.”

https://twitter.com/elonmusk/status/1885789468713476492

कोटक महिंद्रा एएमसीचे एमडी नीलेश शाह यांनी एलॉन मस्क यांच्या पोस्टवर टिप्पणी करताना म्हटले आहे की, “मस्क यांच्या पोस्टवरील प्रतिक्रिया पाहणे मनोरंजक ठरणार आहे. एनआरएम (नारायण मूर्ती) आणि एसएनएस (एसएन सुब्रह्मण्यम) दोघांनाही कामकाजाच्या तासांवरील त्यांच्या विधानांमुळे टीका सहन करावी लागली होती. मूर्ती यांनी भारताच्या विकासासाठी ७० तासांच्या कामाच्या आठवड्याचा प्रस्ताव मांडला होता, तर सुब्रह्मण्यम यांनी ९० तासांच्या कामाच्या आठवड्याचा प्रस्ताव मांडला होता. या दोघांवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.”

काय म्हणाले होते एल अँड टी चे अध्यक्ष?
सोशल मीडियावर गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले होते की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो कंपनी अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे.

याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.” ते पुढे म्हणाले की, “घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”

एलॉन मस्क आणि एसएन सुब्रह्मण्यम यांच्या या विधानांमुळे कामाच्या तासांसंदर्भातील चर्चा पुन्हा उघडली गेली आहे. या विधानांना समर्थन आणि टीका दोन्ही मिळत आहेत. काहींचा असा विश्वास आहे की अधिक कामकाजाच्या तासांमुळे उत्पादकता वाढू शकते, तर इतरांच्या मते यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि वैयक्तिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments