डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पालिका शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ महावितरणाचे अनेक वर्षांपासून रोहीत्र होते. महावितरणाने हे रोहीत्र काढून नेले, परंतु रोहीत्राच्या सभोवती असलेली संरक्षित भिंत तशीच ठेवली आहे. ही भिंत आता वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी करून ठेवलेली असतात. रेल्वे स्थानक भागातील काही रस्ते काँक्रीट कामांसाठी खोदले गेले आहेत, त्यामुळे दुचाकी आणि मोटार कार चालक मिळेल त्या जागेत वाहने उभी करून नोकरीच्या ठिकाणी निघून जात आहेत.
ब्राह्मण सभेच्या पाठीमागील बाजूला कल्याण-डोंबिवली पालिकेची शाळा आहे. या शाळेच्या टिळक रस्ता ते आगरकर रस्ता दरम्यानच्या छेद रस्त्यावर, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महावितरणाचे एक रोहीत्र होते. हे रोहीत्र रस्त्याच्या मध्यभागी होते. पालिकेच्या सूचनेनुसार रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीट कामासाठी महावितरणाने हे रोहीत्र काढून टाकले. या रोहीत्राच्या बाजूला असलेली संरक्षित भिंत महावितरणाने काढली नाही. त्यामुळे मुख्य वर्दळीच्या रस्त्यात ही भिंत अडथळा निर्माण करत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे आणि निमुळत्या जागेतून दुचाकी आणि चारचाकी वाहने ये-जा करत असल्याने टिळक रस्ता ते आगरकर रस्ता दरम्यानच्या छेद रस्त्यावर दिवसभर कोंडी असते.
रोहीत्र काढल्यानंतर रस्ता ठेकेदाराने या भागातील रस्ता रुंदीकरण करून काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. या छेद रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या केंद्रांची मोठी संख्या आहे. त्यांनाही या कोंडीमुळे मोठा त्रास होतो. पेंडेसनगर, सावरकर रस्ता भागातून मानपाडा रस्ता आणि पालिकेकडे जाणारे वाहन चालक ब्राह्मण सभेजवळील छेद रस्त्यावरून आगरकर रस्त्याने इच्छित स्थळी जातात. त्यांना रस्त्यावरील भिंतीमुळे मोठा अडथळा येतो.
महावितरणाने रोहीत्र काढून नेल्यानंतर तेथील संरक्षित भिंत काढणे आवश्यक होते. ती भिंत काढली नसल्यास आणि तेथील अडथळे दूर केले नसल्यास, पालिकेकडून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना ते काढून टाकण्यासाठी सांगण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी सांगितले.