Sanjay Raut On BMC Election 2025: महाविकास आघाडीत खटके, महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची संजय राऊतांची घोषणा
मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता आघाडीत मतभेद उफाळून येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला जोर लावला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) सक्रिय झाली असून, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले होते.
आज (११ जानेवारी) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली. “मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
राऊत यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा
संजय राऊत म्हणाले, “मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आम्हाला स्पष्ट संकेत दिले आहेत. महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढून पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी न दिल्यास पक्षाच्या वाढीवर परिणाम होतो.”
भाजपवर राऊतांचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच एका मुलाखतीत उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात शत्रुत्वाची संस्कृती असू नये. आम्हीही ती संस्कृती पाळली आहे. मात्र, भाजपने शत्रुत्वाच्या राजकारणाची परंपरा सुरु केली आहे, हे दुर्दैवी आहे.”
महाविकास आघाडीत फूट?
संजय राऊत यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद वाढल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने पक्षांमध्ये युती टिकवून ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ठाकरे गटाच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत कोणते समीकरण तयार होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महापालिकेच्या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात, आणि या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.