देवा बॉक्स ऑफिस कलेक्शन डे २: शाहिद कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘देवा’ ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत आहेत. शाहिद आणि पूजाच्या ‘देवा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. या वर्षात ओपनिंग डेवर सर्वाधिक कमाई करणारा ‘देवा’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. आता ‘देवा’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे, हे उघडकीस आले आहे.
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. ‘देवा’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६.२५ कोटींची कमाई केली आहे. याचा अर्थ चित्रपटाच्या कमाईत १६.७३ टक्के वाढ झाली आहे. आतापर्यंत ‘देवा’ चित्रपटाने एकूण ११.७५ कोटींची कमाई केली आहे.
अलीकडेच प्रोडक्शन हाऊस जी स्टुडियोजने सांगितले होते की, ‘देवा’ चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ५.९८ कोटी रुपये होते, तर डोमेस्टिक ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन ६.२८ कोटी रुपये होते. तसेच, ओव्हरसीज जीबीओसीसह ‘देवा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण १०.३० कोटींची कमाई ग्लोबल ग्रॉसवर केली आहे.